आक्रमक ओबीसीनी केली सगे-सोयरे जी आर ची होळी

पुणे- दि. १८ जून | ओबीसी आरक्षणावर घाव घालणारा सगे-सोयरे जी आर रद्द करावा यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ सुरू असलेल्या उपोषण स्थळी आज आक्रमक होत ओबीसी कार्यकर्त्यांनी या जी आर ची होळी केली.
सविस्तर असे की, २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाच्या दबावात येत, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मध्ये “सगे-सोयरे” हा शब्द टाकण्यासाठी एक अधिसूचना काढली. या अधिसूचनेवर राज्यातून सूचना व हरकती मागविण्यात आल्या. या संदर्भात लाखो लेखी हरकती प्राप्त झाल्या आहेत. ह्या हरकती वर सुनावणी घेणे अपेक्षित असताना सरकार टाळाटाळ करीत असून या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या तयारीत आहे.
यासाठी मागील पाच दिवसांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ ऍड. मंगेश ससाणे व ऍड.मृणाल ढोले पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. परंतु या उपोषणाची कुठलीही दखल शासन घेत नसल्याने आज या उपोषणाला पाठिंबा म्हणून आक्रमक ओबीसी कार्यकर्त्यांनी सगे-सोयरे अधिसूचनेची होळी करण्यात आली. यावेळी ओबीसी नेते महेश अण्णा भागवत, गौरीताई पिंगळे, रोहिणी रासकर, शुभम बोरवाके, सुनीता भगत, नितीन बोराटे, यासह बहुसंख्य ओबीसी उपस्थित होते.