श्रीक्षेत्र अरण विकासासाठी सावता सेनेतर्फे मंत्री अतुल सावे यांना निवेदन
अरण – दि.12 | विकासापासून वंचित असलेले संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी तीर्थक्षेत्र अरण जिल्हा सोलापूर च्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सावता सेनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांना निवेदन देण्यात आले.
रविवार दिनांक 11 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांनी अरण येथे हे संत सावता महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी सावता सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात नमूद आहे की, कर्म हीच भक्ती आणि त्यातून मिळालेले यश म्हणजे ईश्वर प्राप्ती हा विज्ञानवादी संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचे तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर हे विकासापासून वंचित आहे. खरे तर महाराष्ट्र सह देशाच्या प्रगतीत संत आणि महापुरुषाचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातून सर्व संताच्या दिंड्या पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात परंतु साक्षात पांडुरंगाची दिंडी पंढरपूरहुन संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सावता महाराजांच्या भेटीसाठी येते तीर्थक्षेत्र अरण विकासासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा व खालील मागण्या मान्य कराव्यात.
( १) संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरणला अ दर्जा देण्यात यावा. (२) देहू, आळंदीच्या धर्तीवर श्रीक्षेत्र अरण विकास प्राधिकरण स्थापन करून विकास कामासाठी निधीची तरतूद करावी. (३) संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा या दिवशी शासकीय महापूजा करण्यात यावी.(४) सावता महाराजांचे टपाल तिकीट काढावे. (५) तीर्थक्षेत्र आरणला संत पिठाचा दर्जा देण्यात यावा व कृषी संशोधन केंद्र सुरू करावे. (६) तीर्थक्षेत्र आरण गावाला बस स्थानक उभारण्यात यावे.
यावेळी सावता सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तुकाराम सातव, उपजिल्हाध्यक्ष विष्णू देवकर, युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा संघटक शिवाजी माळी, ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष सतीश वाघमारे, सतीश बनसोडे, मोहन देवकर, नवनाथ माळी ई. सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.