अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षपदी प्रा.कविताताई कर्डक यांची नियुक्ती
नाशिक,दि.३० जून | नाशिक महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, गटनेत्या प्रा. कविताताई कर्डक यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नुकतीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रा.कविताताई कर्डक या उत्तम अशा वक्त्या असून त्या नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या फुले,शाहू आंबेडकर चळवळीतील प्रभावी कायकर्त्या असून त्यांनी नाशिकमध्ये महिला बचतगटांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रा.कविताताई कर्डक यांच्या नियुक्तीबद्दल नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांनी स्वागत केले आहे.