महाज्योती उभारणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञान संकुल – प्रा दिवाकर गमे
खंडाळा – दि. ३१ | महात्मा जोतीराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असुन ही संस्था क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार परंपरेप्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक कार्य करीत आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले सातारा जिल्ह्यातील नायगाव हे गाव महाराष्ट्रातील महिलांचे स्फुर्तीस्थान आहे. महाराष्ट्राची चेतनाभूमी असलेल्या या नायगावला विद्यार्थींनींच्या अद्यावत प्रशिक्षणासाठी महाज्योतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञान संकुल उभारण्याचा निर्णय घेतलेला असल्याची माहीती संचालक प्रा . दिवाकर गमे यांनी दिली.
राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे राहीले आहे. तसेच विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत . या ठिकाणी नॅशनल डिफेंस अकादमीचे विद्यार्थींनीसाठी अद्यावत निवासी प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. वर्ग ११ वी १२ वी सायन्सचे वर्ग शिकवितांना, त्यामधेच एनडीए, जेईई निट, एमएचसीईटीचे तज्ञ प्राध्यापक मंडळीकडुन प्रशिक्षण दिले जाईल. तसेच या ठिकाणी अद्यावत ग्रंथालय, अभ्यासिका तसेच या परासरातील विद्यार्थीनींसाठी एमपीएससी,युपीएससी , बॅंकीग व इतर स्पर्धा परीक्षेकरीता अद्यावत ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र निर्माण केले जाईल.
यासाठी महाज्योतीला नायगाव परिसरात पाच एकर शासकीय जागा मिळावी म्हणुन, नायगाव येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांना महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी महात्मा फुले वाडा पुणे येथे निवेदन दिले. त्या वेळी महात्मा फुले समता परीषदेचे सरचिटणिस रवी सोनवणे , जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे उपस्थित होते. ॥ नायगाव येथे यापूर्वी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचेही नियोजन करण्यात आले होते. या केंद्राद्वारे अँग्रीकल्चर, बँकिंग अँड अकौंटींग, माहिती व तंत्रज्ञान, फॅशन डिझायनिंग, गारमेंट मेकिंग, ब्युटिकल्चर अँड हेअर ड्रेसिंग, बांधकाम, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटीव्ह रिपेअरींग, मेडिकल अँड नर्सिंग अशा विविध उदयोग व्यावसायाविषयी प्रशिक्षण देण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे . त्याचीही सुरुवात होणे अपेक्षित आहे असे मत अनिल नळे यांनीही व्यक्त केले.