शिक्षणाधिकारी श्री अरविंद मोहिरे रमले जि.प शाळेतील विद्यार्थ्यांमधे
कळंब-जि उस्मानाबाद- दि.31 | तालुक्यातील जिल्हा परीषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा शाळेला उस्मानाबाद जि.प.चे शिक्षणाधिकारी श्री.अरविंद मोहिरे साहेब यांनी अचानक भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री. संतोष भोजने यांनी त्यांचे स्वागत केले. माननीय शिक्षणाधिकारी यांनी शालेय परीसर पाहुन समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापकांनी शालेय परीसरातील सायन्स लॅब, संगणक कक्ष, क्रिडासाहित्य, पाण्याची उपलब्धता, आरओ प्लांट, वाचनालय, शौचालय याबद्दल सविस्तर माहिती दिली.
मागील तीन वर्षात शाळेची पटसंख्या 35 वरुन आज 75 पर्यंत वाढल्याचे सांगितले. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, आतापर्यंत घेतलेल्या चाचण्याची माहिती दिली. मा.शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक वर्गात जाऊन मुलांकडुन वाचन करुन घेतले. तसेच सायन्स लॅब मध्ये सहावी व सातवीच्या मुलांसोबत विविध प्रयोगसाहित्याची ओळख करुन दिली. अध्यापनात येणाऱ्या अडचणी बाबत विज्ञान शिक्षिका श्रीमती सुर्यवंशी मॅडमशी संवाद साधत पर्याय सांगितले. मुलांनी गणित, विज्ञान, भाषा पेटीचा जास्तीत जास्त वापर करावा, स्वयंअध्यन कार्ड वापरावेत असेही सांगितले. शाळेत वर्ग सात असुन पटाअभावी शिक्षक संख्या चारच आहे तेव्हा शालेय समिती व गावकर्यांचा सहभाग घेऊन गावातील स्वयंसेवक नेमण्याची सुचना केली. कार्यरत शिक्षकांचे कौतुक करत शाळेला पुन्हा पुर्वीसारखे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी प्रेरणा दिली. जवळपास दिड तासाची भेट शिक्षक व विद्यार्थ्याना खुपच प्रेरणा देऊन गेली.











