महापुरुषांना स्मरुन ‘सत्यशोधक निवासा’त गृहप्रवेश – व्याख्याने, विज्ञानवादी साहित्य व राज्यघटनेच्या वाचनासह विविध उपक्रम
मातृतिर्थ सिंदखेड राजा | मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीत मौर्य अनिता व आकाश मेहेत्रे यांच्या नुतन सत्यशोधक निवासाचे सत्यशोधक पद्धतीने कुटुंबीय नातेवाईक व मान्यवर यांच्या उपस्थित रविवारी मोठ्या उत्साहात गृहप्रवेश पार पडला. विज्ञानवादी संत सावता महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीाबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले. बुरसटलेल्या, चुकीच्या परंपरा यांचा त्याग करुन विवेकी, तर्कशुद्ध बाबींचे आचारण करण्यात यावे. विवेकी वैज्ञानिक चिकित्सक सत्यशोधकीय व बुद्धीला पटणार्या विचारांना जास्तजास्त कृतीत आणण्याचा प्रयत्न करावे असे सत्यशोधक विचारांचे वाचन करुन प्रत्येकाने अंमलात आणण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
सत्यशोधकीय साहित्याचे वाचन व पुजन अहमदनगर येथील सत्यशोधक विधीकर्ते भिमराव कोथिंबीरे व चाळीसगाव येथील सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक मुलनिवासी वारकरी महासंघाचे राज्यप्रभारी रामेश्वर त्रिमुखे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शाहिर परिषदेचे व सत्यशोधक जिजाऊ शाहीर रामदास कुरंगळ उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत सत्यशोधकीय पद्धतीने प्रथम फुलवेल, वृक्षलागवड करून गृहप्रवेश झाला.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक ग्रुपचे सदस्य, डॉक्टर, व्यापारी, गावकरी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, सोयरेधायरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञानवादी संत सावता महाराज जयंतीनिमित्त मानवतावादी राष्ट्रपुरुषांच्या कर्तृत्व व त्यागाने व सर्व धर्मीय बांधवांच्या सहकार्याने आमचे नुतन सत्यशोधक निवास उभे राहिले आहे, अशी भावना मौर्य आकाश व मौर्य अनिताताई यांनी व्यक्त केली.
सत्यशोधक या निवासस्थानातून समाज परिवर्तनाची उर्जा प्रत्येकाला मिळाली पाहिजे. या हेतूने कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात ‘ओबीसी जातनिहाय जनगणना’ या विषयावर प्रा.सुदाम चिंचाणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रा विनोद इंगळे यांचे ‘ ओबीसी अस्मिता आणि तरुण’ या विषायावर व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ राजकीय नेते तुकाराम खांडेभराड,माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे,विष्णू मेहेत्रे,ओबीसी नेते श्यामभाऊ मेहेत्रे तेल्हारा येथील अँड श्रीकांत तायडे उपस्थित होते. सत्यशोधक विधी व प्रबोधन सत्रात उपस्थितांना ‘संत वाट आणि संस्कार विधी’ हा मौलिक ग्रंथ भेट देण्यात आला.
शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा खर्या अर्थाने मौर्य आकाश मेहेत्रे पुुढे घेऊन जात असल्याचे कौतुक गृहप्रवेशाच्या सोहळ्यात प्रत्येकाच्या तोंडून होत होते.
विज्ञानवादी संत सावता यांच्या जयंतीच्या निमित्ताने मौर्य आकाश व अनिता मेहेत्रे यांच्या ‘सत्यशोधक’ गृहप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.
सत्यशोधक निवास फुलांनी, तोरणांनी सजविण्यात आले होते. रांगोळ्या पायघड्या, विज्ञानवादी साहित्य, सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या साहित्याचे वाचन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करण्यात आला. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात कोणतेही कर्मकांड, होमहवन, भटजी लाटजी नाही, ही पूजा कोणालाही सहज करता येण्यासारखी हे पाहून सर्वजण उत्सुकतेने पाहत होते, हीच खरी पूजा म्हणून सदिच्छा देत होते. दुसर्या मजल्यावर विद्रोही साहित्य ग्रंथालय पाहून आपल्याही घरात असे पुस्तके आसवे, असे विचार प्रत्येकांचे मनात रेंगाळत होते. घर पाहिल्यानंतर भोजनाचा अस्वाद देखील होता. सन्मानीय पाहुन्यांचा पुस्तक देवूनच सन्मान करण्यात आला होता.
- गुलामीतून, अज्ञानाच्या अंधारातून फुले, शाहू आंबेडर यांनी समाजाला बाहेर काढून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. या महापुरुषांच्या वाटेने आपण जात आहोत. आपण सगळ्यांनी याच सत्यशोधकीय वाटेने जाण्याची गरज असल्याची भावना शिक्षिका सौ. सारिका ठाकरे यांनी व्यक्त करत सदीच्छा दिल्या.
- मौर्य आकाश दिवा आहे, तर मौर्य अनिता वात आहे. चळवळीसाठी आपले आयुष्य मेहेत्रे सरांनी वेचत आहे . मौर्य आकाश यांनी वंचित व गरजूंना शिक्षण, गरीबांसाठी सामुहीक लग्न सोहळा व्हावा म्हणून पहिले जोडपे होण्यासाठी पुढाकार घेवून 23 जोडप्यां सोबत सत्यशोधक पध्दतीने आपले लग्न केलेले आहे. आणि आता त्यांनी सत्यशोधक गृहप्रवेश करण्याचा पायंडा परिसरात सुरु केला आहे, तो आपल्याला सतत प्ररेणा देत राहिल, अशी भावना प्रा.राधाजी ठाकरे यांनी व्यक्त करीत राजर्षी शाहू महाराज सामाजिक ग्रुपच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.