डॉ. स्मिता मेहेत्रे लिखित सावित्रीआई फुले पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
सावित्रीबाई फुले यांचे चरित्र वाचण्याची गरज- श्रीमंत माने
नागपूर-दि. 01 | डॉ.स्मिता निशिकांत मेहेत्रे यांच्या “आधुनिक भारतातील पहिली बंडखोर नायिका सावित्रीआई फुले” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमंत माने यांनी, तत्कालीन परिस्थितीत सावित्रीआई फुले यांनी केलेले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे.परंतु आजही समाजात अराजकता दिसून येते त्यासाठी सर्वांनी सावित्रीआई फुले यांचे चरित्र वाचण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
समीक्षक डॉ.लीना निकम म्हणाल्या, डॉ.स्मिता मेहेत्रे हया पुरोगामी आणि परिवर्तनशील चळवळींशी जुळल्या असल्याने त्यांच्या हातून सकस लिखाण झाले आहे. सावित्रीआई यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू उलगडताना पुस्तकाची साधी-सोपी, संवादात्मक भाषा परिणामकारकता साधते.हे पुस्तक आवर्जून सर्वांनी वाचावे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध सावित्रीआईंनी जी बंडखोरी केली तशीच आज विघातक कार्याबद्दल स्त्रियांनी बंडखोरी करणे आवश्यक आहे, असे दैनिक बहुजन सौरभच्या निवासी संपादक व कार्यक्रमाचे अध्यक्षा संध्याताई राजूरकर म्हणाल्या.
सावित्रीआई फुलेंच्याअष्टपैलू व्यक्तिमत्वातील काही भाग प्रत्येकांनी आपले आयुष्य जगत असताना घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पुस्तकाच्या लेखिका डॉ.स्मिता निशिकांत मेहेत्रे यांनी केले. कोरोना काळातील मानवतेची सेवा करणाऱ्या कोव्हिड योद्धांना पाहून प्लेगमध्ये अविरत कार्य करणाऱ्या सावित्रीआईंची प्रकर्षाने आठवण झाली.
सेवाव्रती सावित्रीआई यांच्या विचारांचे तरंग मनाच्या गाभाऱ्यातून उमटले आणि कोरोना काळातच हे पुस्तक आकारास आले,असेही डॉ. स्मिता मेहत्रे म्हणाल्या. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत रणजित मेश्राम यांनी पुस्तकाविषयी “घागर मे सागर “असा अभिप्राय दिला. यावेळी परिवर्तन विचार मंचचे अध्यक्ष विलास गजभिये यांनी लेखिका डॉक्टर स्मिता मेहेत्रे यांचा शाॅल आणि गुलाब रोपटे देऊन सत्कार केला.
डॉ. स्मिता मेहेत्रे यांच्या सावित्री ब्रिगेड तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकपात्री ऑनलाइन नाट्यस्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ.विणा राऊत व संजय सायरे यांनी काम पाहिले होते. त्यांचा प्रमाणपत्र व विचार पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी गायधने, भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन राजेश चिकाटे ,सावित्री आईवर गीत अनिल भगत, पाहुण्यांचा परिचय डॉ.विणा राऊत तर आभार प्रदर्शन विलास गजभिये यांनी केले. कार्यक्रमात “आधुनिक भारतातील पहिली बंडखोर नायिका सावित्रीआई फुले” या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींची विशेष उपस्थिती होती. सौ.प्राप्तीताई माने, ज्ञानेश्वर रक्षक ,निशिकांत मेहेत्रे,डॉ.सिद्धार्थ कांबळे, सुनंदा जुलमे, अरुणा भोंडे, शिल्पा वाहने, प्रणोती कळमकर ॲड. अक्षय मेहेत्रे ,ॲड अंकिता मिश्रा, निशा कापरे ,मिलिंद फुलझेले, भीमराव गायकवाड, वैष्णवी राणेकर, तेजराज राजूरकर, ॲड. बाबू मेश्राम, देविदास कोरे, किरण माटे ,मनोज वाळके गिरीधर हत्तीमारे, डॉ.प्रगती हरले, प्रकाश बावानगडे, लक्षण लोखंडे, आदी साहित्यिक वर्ग व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुस्तकाचा देखणा आणि प्रबोधनात्मक प्रकाशन समारंभ सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्स स्वराज कॉलनी अजनी येथे पार पडला. पुस्तक मिळण्याचे ठिकाण – श्री.साईनाथ प्रकाशन,धरमपेठ नागपूर.संपर्क नंबर – ९८८१७१८२२४ ,९८२३४१४८६५ पुस्तक किंमत – सवलतीच्या दरात फक्त ६० ₹