जिल्हा परिषद माळकरंजा शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

कळंब, जि. धाराशिव – दि. 01 | तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, माळकरंजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात प्रवेश घेणाऱ्या बालकांचा प्रवेशोत्सव क्रमांक एक उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत माळकरंजाचे सरपंच श्री विजय व्यंकटराव शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री नरसिंग गोडसे, उपसरपंच श्री शरद गालट, माजी सरपंच विलास आबा मोहिते यांच्यासह प्रवेश घेणाऱ्या बालकाचे माता पिता उपस्थित होते.
शाळेतील शिक्षिका श्रीमती समीना बागवान व श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या बालकांना शाळेतील विविध खेळणी व शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शाळेबद्दल गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांची शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ओळख करून दिली. तसेच सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह भरण्याचे काम केले. शाळेतील विविध खेळाचे साहित्य, शैक्षणिक साहित्य पाहून चिमुकल्या बालकांना खूप आनंद झाला. त्यांच्या समावेत आलेले पालक यांनाही शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष भोजने, सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांनी परीश्रम घेतले.