नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार कडून मदत मिळवून देऊ – छगन भुजबळ
निफाड, नाशिक २९ सप्टेंबर | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देऊ असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले यावेळी ते बोलत होते.
देवगाव फाटा ता. निफाड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ सावळी विहिर देवगाव फाटा भरवस विंचूर चांदवड किमी२१०/४०० ते २१५ या रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजे किंमत २५०.००लक्ष), भरवस फाटा ता. निफाड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ चांदवड लासलगाव विंचूर सावळीविहीर रस्ता किमी. २०५/४०० ते २१०/४०० ची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन (अंदाजे किंमत २५०.०० लक्ष) छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री. भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, सरपंच सचिन दरेकर, विनोद जोशी, अशोक नागरे, आत्माराम दरेकर, शिवाजी सुपनर, विलास गोरे, माधव जगताप, डुमरे पाटील, सुरेखा नागरे, मनीषा वाघ, योगेश साबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की कोरोना काळात विकासकामांना ब्रेक लागला होता. मात्र तरीही आम्ही विकासकामांचे लक्ष दिले आता विविध कामे सुरू होते आहे. मागील काळात जिल्हा नियोजन समितीचा निधी आपण समप्रमाणात आमदारांच्या मागणी प्रमाणे द्या असे सांगितले मात्र नवीन सरकारने हा निधी थांबविला होता. आता आलेले पालकमंत्री पुन्हा त्याचा आढावा घेणार आहेत त्यातून देखील आलेल्या निधीतून आपण चांगली विकासकामे करू, जनतेची विकासकामे थांबणार नाही.