प्रथा बंद करण्याऐवजी काळानुरूप बदल घडावा ; घोरपडी-मुंढवा येथे आगळावेगळा उपक्रम
पुणे- दि. १४ | महिला वडाची फांदी तोडून पूजा करतात असे न करता, वडाचे रोप त्यांना देऊन त्या रोपाचे पूजन केले गेले. यातून निसर्गाचे संवर्धन ही झाले. तसेच पर्यावरणाची हानी झाली नाही. गौरीताई अक्षय पिंगळे यांच्यामार्फत घोरपडी-मुंढवा येथे वटपौर्णिमा एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
गौरीताई पिंगळे यांनी सांगितले की, आपल्या समाजात जुन्या प्रथा आहेत. त्यात काळानुरूप बदल घडावा. अनेक व्यक्ती या वटपौर्णिमेच्या प्रथेला विरोध करतात. सत्यवानाच्या सावित्रीला मानण्यापेक्षा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सावित्रीला माना असा म्हणणारा वर्ग आहे. मी या मताशी सहमत आहे. परंतु सत्यवानाची सावित्री देखील हुशार होती हे विसरून चालणार नाही. कारण तिने वडाचे झाड हे साठ टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन पुरवणारे झाड असल्यामुळे आपल्या मृत पतीला त्या झाडाखाली ठेवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला. व तो सफल झाला याकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येक महिला वटवृक्ष असेल तिथे जाऊन वडाची पूजा करत होत्या पण, थोडा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बदल करून प्रत्येक महिलेने दरवर्षी एक वडाचे रोप आणावे व त्या वडाची पूजा करून त्या रोपाचे कुठेतरी अशा जागेत वृक्षारोपण करावे की जेणेकरून तो पुढे वटवृक्ष झाला पाहिजे.
गौरीताई म्हणाल्या कि, विधवा महिलांनी वडाची पूजा का करू नये? वडाची पूजा हि जर नवऱ्यासाठी करायची असेल आणि तो सात जन्म मिळावा म्हणून करायची असेल तर मग एका जन्मा मध्येच विधवा झाल्यानंतर तिने पूजा करणे बंद का करावे? त्या असे देखील म्हणाल्या, हा एक श्रद्धेचा भाग आहे आपण कोणावरही बंधने लादू शकत नाही पण आपले विचार व्यक्त करू शकतो. आणि एक आवर्जून सांगेल की तुम्ही वडाच्या झाडाला हजारो फेरे मारा पण सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याला वर्षातून एकदा तरी एक फेरी मारा….











