माळकरंजा जि प शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
कळंब-दि. 19 | तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत नुकताच इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विजय व्यंकटराव शिंदे आणि सरपंच विलास जी मोहिते यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व इयत्ता पहिली चे पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस शाळा पूर्वतयारीसाठी गावातून प्रवेश फेरी काढण्यात आली. यावेळी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेटा बांधून त्यांचे प्रभात फेरीत स्वागत करण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळावा याबाबत श्री हनुमंत घाडगे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना माहिती दिली.
गावातून या विद्यार्थ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. शाळेत आल्यानंतर त्यांचा प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. त्याचबरोबर या सर्व मुला मुलींची शारीरिक,भावनिक व बौद्धिक चाचणी घेऊन नोंदणी करण्यात आली. पालकांना व विद्यार्थ्यांना कार्ड आणि पूर्वतयारी चे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री संतोष भोजने यांनी केले तर आभार श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी मानले.
या वेळी शाळेत महिलांचा मेळावाही घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा संस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्या बद्दल महिला पालकांशी सुसंवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक ,बौद्धिक विकासाबरोबरच सांस्कृतिक सुप्त गुणांना ही वाव देण्याचे नियोजन या महिला पालक मेळाव्यामध्ये करण्यात आले. यावेळी सहायक शिक्षिका श्रीमती समीना बागवान, स्वयंसेविका श्रीमती वैष्णवी क्षीरसागर ,कुमारी स्नेहल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.