माळी युवा संघटनेची 21 गाव शाखा बैठक संपन्न -13 गावांच्या कार्यकारणी जाहीर तर उर्वरीत कार्यकारणी लवकरच गठीत होणार
खामगाव- दि. 04 | माळी सेवा मंडळ खामगाव अंतर्गत माळी युवा संघटनेची 21 गावांची बैठक नुकतीच रविवार 27 फेबु्वारी 2022 रोजी दुपारी माळी भवन खामगाव येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद बगाडे हे होते. याच बैठकीमध्ये 13 गावाची युवा शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून उर्वरीत कार्यकारणी लवकरच गठीत करण्यात येणार आहे.
माळी सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यापासून माळी युवा संघटनेच्या वतीने गाव तेथे शाखा मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच परिपाक म्हणून तालुक्यातील 65 माळी समाज बहुल गावांपैकी 21 गावात माळी समाजाचे युवा नेते योगेश हजारे, दत्ता जावळकर, जयेश वावगे यांच्यासह माळी सेवा मंडळाच्या जेष्ठ पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष जावून युवकांच्या बैठकी घेतल्या, या बैठकीत युवकांना माळी युवा संघटन का व कशासाठी याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे या 21 गावातील तरूणांनी पुढाकार घेवून आपल्या गावामध्ये माळी युवा संघटन शाखा गठीत केल्या आहेत. त्यातील 13 गावातील शाखा जाहीर करण्यात आल्या असून अध्यक्षासह संपुर्ण कार्यकारणी चे यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी साधला युवकांशी संवाद
माळी समाजातील अधिकारी व कर्मचार्यांचा परिचय ग्रामीण भागातील युवकांना व्हावा तसेच अधिकार्यांना सुद्धा आपल्या समाजातील तरूणांच्या समस्या, प्रश्न समजून घेता यावे यासाठी या 21 गावातील युवकांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थिती अधिकारी व कर्मचार्यांनी ग्रामीण भागातील समस्या समजून घेवून आपण आमच्या पर्यंत समस्या पोहचवा आम्ही त्याचे निराकरण निश्चीतच करू यासह शैक्षणीक, सामाजीक, आर्थीक सह सर्वच क्षेत्राबाबत युवकांना मार्गदर्शन करीत संवाद साधला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन माळी युवा संघटनेचे जयेश वावगे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले होते. या 21 गावांमध्ये पहुरजीरा, जलंब, गोंधनापूर, कंझारा, आसा दुधा, आंबेटाकळी, गवंढाळा, अकोली, लाखनवाडा, भंडारी, निपाना, बोरजवळा, पिंप्री गवळी, कारेगाव, सुटाळा बु., सुटाळा खु., लांजुळ, जयराम गड, अंत्रज, गणेशपूर, बोरीअडगाव आदी गावांचा समावेश आहे.
अन्यथा आमरण उपोषण-योगेश हजारे
खामगाव सामान्य रूग्णालयास म.ज्योतीबा फुले खामगाव सामान्य रूग्णालय असे नाव देण्यात आले होते. मात्र सामान्य रूग्णालयाच्या भिंंतीचे नुतनीकरण करत असताना सदरचे नाव काढण्यात आले आहे. यासंदर्भात माळी समाज बांधवांवर अन्याय होतो आहे. यासंदर्भात माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे माळी सेवा मंडळाकडून वेळोवेळी रूग्णालय प्रशासनास व आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. परंतू अद्यापही म.फुलेंचे नाव खामगाव सामान्य रूग्णालयास देण्यात आले नाही. दि.11 एप्रिल 2022 रोजी म.फुले यांची जयंती असून त्यापुर्वी सदरचे नामकरण करण्यात यावे अन्यथा 11 एप्रिल रोजीच दुपारी 3 वाजेनंतर खामगाव एसडीओ कार्यालयासमोर माळी युवा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा माळी युवा संघटनेचे योगेश हजारे, दत्तात्रय जावळकर व जयेश वावगे यांनी दिला आहे.
पुर्वी प्रमाणेच महात्मा ज्योतीराव फुले खामगाव सामान्य रूग्णालय नाव देण्यात यावे-प्रल्हाद बगाडे
माळी समाजाच्या पोट शाखा मिटवून एकत्रीतपणे समाजाची शक्ती वाढवून त्या माध्यमातून प्रगती साधावी असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून प्रल्हाद बगाडे यांनी केले. तसेच खामगाव सामान्य रूग्णालयास पुर्वी प्रमाणेच म.ज्योतीराव फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रल्हाद बगाडे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी केली आहे.
यावेळी माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीप सातव, जेष्ठ पदाधिकारी भास्करराव चरखे, महादेव खंडारे, राजेंद्र बोचरे, अजय तायडे, संजय तायडे, सदानंद खंडारे, पांडूरंग राखोंडे, योगेश हजारे, दत्ता जावळकर, जयेश वावगे यांच्यासह आदींची मंचावर उपस्थिती होती. उपरोक्त मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुटाळा खुर्दचे उपसरपंच जयेश वावगे तर प्रास्ताविक प्रदीप सातव व आभार प्रदर्शन दत्तात्रय जावळकर यांनी केले. नवनिर्वाचीत कार्यकारणीचे यावेळी स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजीक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.