आपला जिल्हा

सावित्रीबाईंची अलर्जी का? हे तर बाळ गांगलचेच ‘खरे’ भाईबंद – प्रा. हरी नरके

सावित्रीबाई फुले यांची जयंती लोकमाणसात रुजताना बघून सनातनी छावनीने विविध हातखंडे वापरून विरोधाला सुरुवात केलीय. बुद्धीभेद करणे, मुख्य विषयाकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी फाटे फोडणे, त्यासाठी पुरोगामी छावणीतल्या काही वेडसर लोकांच्या हातात कोलीत देऊन त्यांना कामाला लावणे असे उपद्व्याप सुरू झालेत.

आता कुणी म्हणताहेत सावित्रीमाई जयंती हा सापळा आहे. ती बायकांनीच का करायची? आम्ही कुंकू सोडलंय मग आम्हाला चिरी लावायला सांगणं हा आमच्यावर अन्याय नाही का? खरं तर असल्या लोकांना अदखलपात्र मानणं सर्वात उत्तम रणनीती.

त्यांचा नामोल्लेख करणं म्हणजे असल्या विक्षिप्त, एकाकी, नैराश्यग्रस्त किंवा वेडसर लोकांना उगीच डोक्यावर घेणं होय.
ज्यांनी कुंकू सोडलंय त्यांना आडवी चिरी लावायला कुणीही सांगितलेलं नाही. तुम्हाला नसेल लावायची तर तुम्हाला कोणी सक्ती केलीय का? नका लावू. पण ज्या बायका कुंकू लावतात त्यांनी सावित्रीमाईंची आठवण म्हणून एक दिवस उत्स्फूर्तपणे आडवी चिरी लावणं ही गुलामी होय असली पोपटपंची करणारी रोगट मानसिकता तपासायला हवी.

स्पष्ट सांगा ना की आम्हाला सावित्रीमाई फुले या नावाची अलर्जी आहे. आम्हाला एकवेळ ते चालेल, कारण उघड विरोधक/ शत्रूशी लढणं सोपं असतं. हे पुरोगामीत्वाच्या कळपात घुसलेले लबाड पेशवाई मेंदू अतिशय घातक. त्यांच्या रिमोटवर चालणारे बहुजन तर त्याहून घातक. इथे मुद्दा जातीचा नसून सडक्या, सनातनी विचारधारेचा आहे.

मनश्री पाठक यांनी गेल्या वर्षी ABP माझावर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम केला होता, तेव्हा सावित्रीबाईंचा फोटो दाखवून महाविद्यालयीन मुलामुलींना तुम्ही यांना ओळखता का असे विचारले असता फारसे कोणीही बरोबर उत्तर देऊ शकले नाही.

तरीही ज्यांना सावित्री उत्सव खुपतोय ते कोणत्याही जातीचे असू द्या, स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समता आणि जातिनिर्मूलनाचे विरोधक आहेत हे स्पष्ट करणे भाग आहे.

ज्यांना प्रतीकं नकोत, उत्सव नकोत, कुटुंबं नकोत, लग्न नकोत त्यांच्या वाटेला आम्ही जात नाही. त्यांना तसे स्वातंत्र्य आहेच. पण ते मुद्दाम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीआड येणार असतील तर मग आम्हाला त्यांना अंगावर घ्यावेच लागेल. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. सावित्रीबाई जयंती हा तुम्हाला सापळा वाटतो कारण मुख्य प्रवाहात तुम्हाला कुणीही विचारत नाही. तुमच्यामागे तुमच्या पोटच्या मुलीसुद्धा नसतात, कारण तुम्ही मुळातच माणुसघाणे, वेडसर, अतिरेकी आणि एकांगी लोक असल्याने ते तुम्हाला फाट्यावर मारतात. अशांच्यापाठीशी उभे राहणारे पुरोगामी असोत की आणखी कुणी त्यांच्याही बाबतीत आम्हाला इंद्राय स्वाहा… हीच रणनीती वापरावी लागेल.

होय आम्ही सावित्रीउत्सव करणार, त्याच्या आड येणारे, बुद्धीभेद करणारे, फाटे फोडणारे आम्हाला आमचे मित्र वाटत नाहीत. ते कुठल्याही जातीचे असोत आम्ही त्यांची गय करणार नाही. राज्यघटनेच्या चौकटीत राहून कायदेशीर मार्गांनी अशांना सरळ करावे लागेल.[author title=”प्रा. हरी नरके” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/Hari-narke.jpg”]जेष्ठ विचारवंत, साहित्यिक[/author]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button