संपादकीय

राज्यसभेसाठी डॉ.प्रज्ञाताई सातव यांना डावलून रजनी पाटील यांना उमेदवारी

काँग्रेस पक्षाचे देशातील वजनदार नेतृत्व राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राजीव सातव यांच्या नंतर खासदारकीची संधी त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांना मिळणे अपेक्षित होती. किंबहुना त्याची तयारी काँग्रेस कडून दाखवण्यात आली होती मात्र ऐन वेळी रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांच्या अपेक्षावर पाणी फिरवले गेले.

डॉ.प्रज्ञाताई सातव यांना फक्त काँग्रेस उपाध्यक्ष करून सांत्वन दिले का ?
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने आपली प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यात डॉ. प्रज्ञाताई सातव यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. परंतु आता त्यांची खासदारकीची उमेदवारी कापून त्यांना फक्त काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष एवढ्याच पदावर सांत्वना देण्यात आली का ? अशी चर्चा महाराष्ट्रभर रंगत आहे.

काम सरो, वैद्य मरो
दिवंगत राजीव सातव यांचे काँग्रेसच्या उभारणीत खूप मोठे योगदान आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट होती. महाराष्ट्रात सुद्धा मोदी लाटेत सर्वच विरोधी पक्षांची दैना झाली होती. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त दोन मतदार संघात काँग्रेसला यश संपादन करता आले होते.

त्यातील महत्त्वाचा म्हणजे प्रचंड अशा मोदी लाटेत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजीव सातव यांनी आपली सीट भरघोष मताधिक्क्याने निवडून आणत काँग्रेसची इज्जत राखली होती. त्याचप्रमाणे राजीव सातव यांनी लोकसभेत व राज्यसभेत काँग्रेस पक्षाची प्रखरतेने बाजू मांडून, काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे.

 

त्याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञाताई सातव यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देणे अपेक्षित होते. तसी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि राजीव सातव यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु ऐनवेळी रजनीताई पाटील यांना उमेदवारी देऊन या अपेक्षेवर पाणी सोडले गेले, त्यामुळे काम सरो अन वैद्य मरो अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहे.

मग आता डॉ. प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषद मिळणार की विधानसभा मिळणार ?
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे नाव देण्यात आले होते. मात्र आता रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत डॉ. प्रज्ञाताई सातव यांना स्थान मिळेल का ? की प्रज्ञाताई यांना 2024 मध्ये कळमनुरी मतदार संघातून विधानसभेसाठी संधी मिळणार ? त्यांना विधान परिषद मिळणार की विधानसभा मिळणार ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र राजीव सातव यांच्या नंतर त्यांच्या पत्नी डॉ.प्रज्ञाताई सातव यांना संधी दिली गेली नाही हे रुखरुख मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात नेहमी राहील.

प्रविण बोचरे
मुख्य संपादक
क्रांतीसूर्य न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button