‘आम्ही बोळ्याने दूध पिलो नाही, कामधंदा केला’, छगन भुजबळांचा सोमय्यांवर पलटवार
मुंबई: ०१ सप्टेंबर | भाजपचे किरीट सोमय्या यांनी राज्याचेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईतील सांताक्रुझ येथे भुजबळांची ९ मजली इमारत आहे.ज्याठिकाणी एक खोली मिळणे अवघड आहे अशा ठिकाणी भुजबळ यांना ९ मजली इमारत कशी मिळते, ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी भुजबळ यांचा काय संबंध आहे? असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांना केले आहेत. दरम्यान आता यावरच भुजबळ यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
छगन भुजबळ यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्यावर खोटे आरोपसत्र सुरु आहे. मी वयाची ७५ गाठली आहे. त्यावेळी आम्ही लहान असताना १० हजार,१५ हजार एकराने घेतलेल्या जागांची आता किमंत वाढली. तुम्ही त्या जमिनीची किंमत आताच्या भावाने सांगता. जणू काही आम्ही ७५ वर्षे घरातच बसून होतो काय? आम्ही इतकी वर्षे बोळ्याने दूध नाही पिलो तर कामधंदे केले आहेत. असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे खोटे आरोप करणे थांबवावे असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
सांताक्रुझ येथील इमारत आमचं जुनं घर आहे. ते पाडून बांधण्यात आलं आहे. २.५ एफएसआय मिळतो. त्या पुनर्बांधणीच्या स्किममधली ती वास्तू आहे. त्यातील अर्धे गाळे मूळ मालकाला द्यायचे आहेत. तर अर्धे आमच्याकडे राहणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चालू असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.